Monday, May 18, 2015

ऐल माझा गाव, पैल माझा देव गं

ऐल माझा गाव, पैल माझा देव गं 
जाऊ दे सोडून नीती ओढून नेतो भाव गं ...

मिटतात पापण्या आणि उसळतो आठवणींचा सागर
मी समिधा माझी वाहून जपला तुझ्या स्मृतींचा जागर 
कंठात दाटतो हुंदका अन काळजात घाव गं ...
 
वाळूत खुणा अजुनी का जसे व्रण ताजेच असावे
ओझे धरणीवरती जे माझे अस्तित्व मिटावे 
माझ्या पापी राखेला इथे नको ठाव गं ...
 
मी मोहाने थरथरले, मी वाऱ्यावर भिरभिरले 
या दिशा दहा हसतात, मी इथे फक्त फरफटले 
आता पुन्हा दे धीर, भोवती भूतांचा घेर 
हि आर्त ऐक रे हाळी, वासना सांडो आंधळी 
हा तुटता आतून पीळ, सावरे मला घननीळ 
ऐल माझा गाव पैल माझा देव गं ..

No comments:

Post a Comment