Tuesday, May 5, 2015

तुला पाहिले मी नदीच्या किनारीं

तुला पाहिले मी नदीच्या किनारीं
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेंतले सावळे !

तुझी पावलें गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली ...

धराया विनाशास संदर्भ माझे
जशा संचिताने दिशा पेटल्या
तुझ्या सांद्र ओढाळ देहात तुजला
नदीच्या कळा कोणत्या भेटल्या ...

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे ...

अशी ओल जातां तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरीं केवढा
तमांतूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा ...

No comments:

Post a Comment